Thursday, May 6, 2010

व्यक्तिवेध : शाहिद आझमी

बुधवार, ५ मे 2010
http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=67145:2010-05-04-15-02-54&catid=31:2009-07-09-02-02-32&Itemid=9

loksatta

ते फक्त वकील नव्हते. अमर्याद सत्तेच्या बळावर पोलीस दलात निर्माण झालेल्या हजारो घाशीराम कोतवालांच्या विरोधात त्यांनी न्यायालयीन मार्गाद्वारे मोठी आघाडी उघडली होती. स्वतची कार्यकुशलता सिद्ध करण्यासाठी निर्दोष निष्पापांना खोटय़ा आरोपाखाली अडकवून त्यांची आयुष्ये बरबाद करण्याच्या पोलिसी खाक्याला चाप लावण्यासाठी त्यांचे संवैधानिक मार्गाने जणू युद्धच सुरू होते. त्याचीच किंमत शाहिद यांना अखेर द्यावी लागली. फहीम अन्सारी आणि सबाउद्दीन यांची बाजू विशेष न्यायालयापुढे मांडताना त्यांनी केलेला युक्तिवाद इतका बिनतोड होता की, संशयित म्हणून मुंबई गुन्हे शाखेने पकडलेल्या या दोन तरुणांना शाहिद यांच्या मृत्यूनंतरही अखेर न्याय मिळाला. शाहिद यांचे आयुष्य म्हणजे एखाद्या वास्तववादी अ‍ॅक्शनपटाच्या पटकथेसारखे होते. लहानपणीच वडिलांचा मृत्यू झाल्याने शाहिद व त्याची चार भावंडे गोवंडीच्या झोपडपट्टीत आईबरोबर राहिली. मामांच्या मदतीवर कसेबसे घर चालविणाऱ्या आईसाठी लवकर शिकून कामधंद्याला लागावे असेच इतर कोणत्याही तरुणाप्रमाणे शाहिदचेही स्वप्न होते. मात्र १९९२ साली शाहीद अकरावीत शिकत असतानाच बाबरी मशीदीचा विध्वंस झाला आणि त्याच्या आयुष्याने मोठे वळण घेतले. १९९२-९३ ला मुंबई शहरात भयंकर दंगल उसळली. शाहिद ज्या गोवंडीत राहात होता, तो भाग तर दंगलीने प्रचंड होरपळला. शाहिदलाही एकदा एका दंगेखोर जमावाने पकडले. शाहिद खरेतर तेव्हाच मारला गेला असता मात्र त्याच्या हिंदू शेजाऱ्याने त्याला कसेबसे जिवावर उदार होऊन वाचवले; त्याच्या आठवणी शाहिद कायम सांगत असे. दंगलीत झालेले अत्याचार आणि पोलिसांच्या उघड पक्षपातीपणाने उद्विग्न झालेल्या अवघ्या १७ वर्षांच्या शाहिदचा या व्यवस्थेवरचा विश्वासच उडाला. राहात असलेल्या मुस्लिम वस्तीतील काही समवयस्क मूलतत्त्ववादी तरुणांच्या सान्निध्यात तो आला आणि व्यवस्थेशी लढण्याचे खोटे स्वप्न दाखवून त्या तरुणांनी त्याला काश्मीरला नेले. मात्र कायम स्वतची बुद्धी, तर्क आणि मानवी स्वातंत्र्यावर गाढ विश्वास असलेल्या शाहिदचे तेथील मुस्लिम मूलतत्त्ववाद्यांशी पटले नाही. त्यांच्याशी भांडून तो तीनच दिवसांत मुंबईत परतला. परंतु तोवर गुप्तचर यंत्रणांना त्याची माहिती त्या मूलतत्त्ववादी गटानेच पुरवली होती. शाहिदला तात्काळ अटक केली गेली. त्याला दिल्लीला हलविले गेले. ५० दिवस लाल किल्ल्यामध्ये असलेल्या गुप्त कोठडीत त्याची पोलिसी खाक्यात चौकशी केली गेली व त्यानंतर त्याला टाडा कायद्याखाली अटक झाली. जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला व शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या खुनाचा कट रचण्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला होता. शाहिदची रवानगी तिहार तुरुंगात झाली. तेव्हा तिहारच्या तुरुंगाधिकारी किरण बेदी होत्या. त्यांनी कैद्यांच्या शिक्षणासाठी सुरू केलेल्या उपक्रमातून शाहिदने बारावीच्या परीक्षेत यश मिळविले आणि पाठोपाठ इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठातून इंग्रजी साहित्य घेऊन बी.ए.ची पदवी घेतली. सहा वर्षांनंतर सर्वोच्च न्यायालयाने शाहिदची सर्व आरोपांतून निर्दोष मुक्तता केली. मुंबईत परतल्यानंतर शाहिदने के. सी. महाविद्यालयातून पत्रकारितेचा अभ्यासक्रम पूर्ण केला. मात्र त्याच्या कथित भूतकाळामुळे त्याला कुठेही नोकरी मिळाली नाही. अखेर त्याने वकिली करण्याचा निर्णय घेतला व के. सी. महाविद्यालयातूनच एलएल.बी. पूर्ण केले. एलएल.बी.ला चांगले गुण मिळवूनही पुन्हा एकदा त्याच कथित भूतकाळामुळे त्याला सनद मिळण्यासाठी प्रचंड झगडावे लागले. मग शाहिदने कायम पोलिसी अत्याचाराने नाडलेल्या लोकांचेच खटले घेण्याचा निश्चय केला. शाहिद यांनी केवळ मुस्लिमांवर झालेल्या पोलिसी अत्याचारांविरोधातच न्यायालयीन लढाई लढली नाही तर सेक्युलर लोकशाहीवादी भूमिकेचा ठाम पुरस्कार करत, नक्षलवादाचा ठपका ठेवून पकडलेल्या अनेक डाव्या कार्यकर्त्यांसाठीही प्रसंगी मोफत लढाई लढली. शाहिद सर्वप्रथम प्रकाशात आले ते घाटकोपर बॉम्बस्फोटातील आरोपींचे वकीलपत्र घेतले तेव्हा. या प्रकरणात त्यांनी न्यायालयासमोर बाजू मांडताना पोलिसांना पार उघडे पाडले. गुन्हा घडल्यावर स्वतची कार्यकुशलता दाखविण्यासाठी कुठल्याही निष्पाप तरुणांना उचलावे, यथेच्छ धोपटावे, हवा तसा कबुलीजबाब घ्यावा आणि प्रसारमाध्यमांतील काही जणांना हाताशी धरून त्यांच्या विरोधात वातावरण तापवावे या पोलिसी क्लृप्त्यांचे बिंग त्यांनी न्यायालयात फोडले. या प्रकरणात पकडलेल्या निष्पाप तरुणांना त्यांनी निर्दोष सोडवले. त्यानंतर शाहिद यांच्याकडे अशा प्रकरणांचा ओघ वाढू लागला. मुंबई सत्र न्यायालयात अत्यंत थोडय़ा कालावधीतच त्यांचे नाव सुदीप बासबोला यांच्यासारख्या निष्णात वकिलाच्या तोडीस तोड म्हणून घेतले जाऊ लागले. शाहिद स्वत पोलिसी अत्याचाराचे बळी असल्यामुळे त्यांना या अत्याचारांची प्रचंड चीड होती. त्यामुळे न्यायालयाबाहेर पोलिसांशी होणाऱ्या तडजोडीच्या फंदात ते कधी पडले नाहीत. उलट विजय तेंडुलकर व असगरअली इंजीनिअर यांच्या प्रयत्नांतून उभ्या राहिलेल्या ‘कमिटी फॉर प्रोटेक्शन ऑफ डेमॉक्रॅटिक राइट्स्’साठी त्यांनी काम सुरू केले. दहशतवादाविरोधातील कायदे केवळ केंद्र सरकारच संमत करू शकते, त्यामुळे दहशतवादी म्हणून पकडलेल्यांना मोक्का या राज्याच्या कायद्यांतर्गत अटक केली जाऊ शकत नाही, या मूलभूत मुद्दय़ावर त्यांनी केलेल्या युक्तिवादाचे प्रतिपक्षाच्या वकिलांनीही कौतुक केले. फहीमवर २६/११ च्या हल्ल्यातील आरोपींना मदत केल्याचा आरोप जेव्हा मुंबई पोलिसांनी ठेवला, तेव्हा फहीमची या प्रकरणातून सुटका होणे कठीण असल्याचे त्याच्या पत्नीला अनेक वकिलांनी सांगितले. मात्र फहीम निर्दोष असल्याचे शाहिद आझमी यांचे मत अगदी पहिल्या दिवसापासून होते. मारल्या गेलेल्या अतिरेक्याच्या पँटच्या खिशात मिळालेला नकाशा फहीम आणि सबाउद्दीनने बनवल्याचे पोलिसांचे म्हणणे खोडून काढताना शाहीद यांनी अनेक मुद्दे न्यायालयाच्या निदर्शनास आणले. रक्ताने माखलेल्या पँटमधील नकाशाला रक्त कसे लागले नव्हते, हा नकाशा पाकिस्तानातून इथे आणेपर्यंत आणि इतक्या धामधुमीत चुरगळला कसा गेला नाही, हे शाहिद आझमींचे मुद्दे, न्यायाधीशांनी या दोघांची निर्दोष मुक्तता करताना उद्धृत केले. शाहिद यांनी हा खटला ज्या पद्धतीने चालवला त्यातून फहीम आणि सबाउद्दीन यांचे प्रकरण पोलिसांच्या आणि गुप्तचर यंत्रणांच्या अंगाशी येणार, हे खटला सुरू असतानाच नक्की झाले होते. त्यामुळे आपले बरेवाईट होणार, याचा अंदाज हा खटला सुरू असतानाच शाहिद आझमींना आला होता. अनेक पत्रकार मित्रांकडे त्यांनी हा अंदाज व्यक्तही केला होता. त्यांच्या खुनाच्या दोन दिवस आधी त्यांना भेटायला गेलेल्या एका इंग्रजी वर्तमानपत्राच्या प्रतिनिधीला, ‘माझ्याकडे येणे बंद कर, माझ्यावर कधीही हल्ला होऊ शकतो’, असेही ते म्हणाले होते. लेनिन यांनी शासनसंस्थेची वैशिष्टय़े सांगताना म्हटले होते की, जेव्हा संघटनेशिवाय केवळ व्यक्ती म्हणून तुम्ही शासनसंस्थेशी झगडता व तिला जेरीस आणण्याचा प्रयत्न करता, तेव्हा शासनसंस्था तुम्हाला जगाच्या सारीपाटावरून नाहीसे करते. शाहिद यांचा खून कोणी व कशासाठी केला याची चौकशी होईल, असे गृहमंत्री आर. आर. पाटील म्हणाले असले, तरी प्रत्यक्षात या खुनातील सत्य कधीही बाहेर येणार नाही. मात्र भारतातील लोकशाही टिकवून ठेवण्यासाठी झगडणाऱ्यांना व जीव धोक्यात घालून अशी सत्ये जगासमोर आणणाऱ्या पत्रकारांना शाहिद यांच्या मृत्यूमागील कारणे पक्की माहीत असल्यानेच, त्यांच्या शाहिदी बाण्यापुढे ते कायम नतमस्तक राहतील.

source:
http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=67145:2010-05-04-15-02-54&catid=31:2009-07-09-02-02-32&Itemid=9

No comments: